देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत थंडीचा कडाका कायम राहिला असून कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी म्हणजे १७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय इतर ही अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली. त्यानुसार ५ ते ११ जानेवारी दरम्यान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे पुढील दोन दिवस उत्तर भारतात थंडीची लाट तसेच ५ ते ११ जानेवारी दरम्यान मध्य भारतात काही भागांमध्ये थंडीची लाट येऊ शकते. यामध्ये विशेषत: मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिणेकडील उत्तर प्रदेशच्या भागात थंडी वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान दिवसाचे तापमान देखील सामान्य पातळीपेक्षा कमी असेल.
उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानच्या तुरळक भागात १ आणि २ जानेवारी रोजी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्व राजस्थानच्या तुरळक भागात १ ते ३ जानेवारी, मध्य प्रदेशात २ जानेवारी आणि पश्चिम राजस्थानमध्ये ३ जानेवारी २०२४ रोजी थंडीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जानेवारी २०२४ मध्ये मध्य भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार ४ जानेवारीपर्यंत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका दे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तरेकडूल राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगज येथे मंगळवार, बुधवार हलका पाऊस पडू शकतो.