राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलेच पेटले आहे. आरक्षणावरुन मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जाहीर सभा घेत छगन भुजबळांवर निशाणा साधत आहेत, तर ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळही पलटवार करताना दिसत आहेत. आज (शनिवार, १६ डिसेंबर) वर्ध्यामध्ये ओबीसींची एल्गार सभा होणार असून छगन भुजबळांसह सर्व ओबीसी नेते या सभेला हजर राहणार आहेत.
विदर्भातील पहिली ओबीसी एल्गार सभा वर्ध्यामध्ये होत आहे. वर्धा शहरातील जुन्या आरटीओ ऑफिसच्या मैदानावर सकाळी ११ वाजता ही सभा सुरू होईल. विदर्भातील ही पहिली ओबीसी एल्गार सभा असून सभेला एका लाखांच्या जवळपास ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याच आयोजकांनी सांगितले आहे.
या महाएल्गार सभेला छगन भुजबळ हे मुख्य मार्गदर्शन करणार असून, प्रकाशअण्णा शेडगे, महादेव जानकर, खा. रामदास तडस, आ. गोपीचंद पडळकर, डॉ. बबनराव तायवाडे, शब्बीर अन्सारी, प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. लक्ष्मण गायकवाड व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे.
मराठा बांधवांना आरक्षण मिळावे; पण ते ओबीसींच्या प्रवर्गातून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसोबतच शिंदे समिती बरखास्त करून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा.. अशी ओबीसी बांधवांची मागणी आहे.
सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडत जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.