Thursday, October 17, 2024
Homeताज्या-बातम्याVideo: “मंत्रालयात गुंडांकडून रील्सचं शूटिंग”, विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “हीच का...

Video: “मंत्रालयात गुंडांकडून रील्सचं शूटिंग”, विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “हीच का मोदी की गॅरंटी?”

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यानं थेट मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे. विरोधी पक्षांनी यावरून शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. एकीकडे सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रांगा लावाव्या लागत असताना दुसरीकडे अशा गुंडांना थेट मुख्यमंत्री भेटतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर पोस्ट केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

संजय राऊतांच्या पोस्टनंतर चर्चेला सुरुवात

मंगळवारी सकाळी संजय राऊतांनी केलेल्या पोस्टवरून चर्चेला सुरुवात झाली. “महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तृत्व काय? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शाह यांच्या राज्यकर्त्या टोळीने?” असा प्रश्न करत संजय राऊतांनी निलेश घायवळचा मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर केला होता.

विजय वडेट्टीवार यांची खोचक पोस्ट!

दरम्यान, कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर केलेल्या पोस्टमध्ये या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे”, असं विजय वडेट्टीवार या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. यासोबत त्यांनी संबंधितांनी मंत्रालय परिसरात तयार केलेलं एक रीलही पोस्ट केलं आहे.

“महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती ‘मोदी की गॅरंटी’?” असा खोचक सवालही त्यांनी केला.

पत्रकार परिदेत मुद्द्यावर सविस्तर भाष्य

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं. “निलेश घायवाळ हा जामिनावर बाहेर आहे. जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयात रील तयार करतो आणि बाकीचे लोक रांगेत मरतात. बाकीच्या लोकांना रांगेत उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे. गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारं हे सरकार आहे. हा कशी एवढी हिंमत करतो? गंभीर गुन्हे असणारा जामिनावरील व्यक्ती मुख्यमंत्र्यांना सहाव्या माळ्यावर जाऊन भेटतोय”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

“आम्हाला हे माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कष्टातून मोठे झाले. पण पक्ष फोडल्यानंतर एवढं पाशवी संख्याबळ त्यांच्या पाठिशी असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना भेटण्याची का गरज पडत आहे? याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर करावा. पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची लाज घालवली. आता उरली-सुरली गुंडांना प्रवेश देऊन घालवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments