चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून गत १६ व्या आणि विद्यमान १७ व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २४८ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ६२९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
इतकेच नाही, तर १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग आठ संसदरत्न पुरस्कार तसेच संसद महारत्न पुरस्काराने गाैरवण्यात आले आहे. खा. सुळे यांना आज प्रदान करण्यात आलेला संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार हा दहा वर्षातून एकदा देण्यात येतो.
हा पुरस्कार स्वीकारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदाराचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत मतदार संघातील जनतेला पुरस्कार अर्पण करत असल्याचे सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासोबतच खासदार श्रीरंग बारणे, तसेच भाजप नेत्या हिना गावित यांनाही संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.