राजकोटच्या निरंजन शहा मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत.
भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ही पट्टी हाताला बांधली. मात्र यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुनील गावस्करचं म्हणणं आहे की, भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशीच काळ्या रंगाची पट्टी घालायला हवी होती. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की,’ उशीरा आलेलं शहाणपण… त्यांनी पहिल्याच दिवशी हे करायला हवं होतं. त्यांनी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. त्यांनी ५ सामन्यांच्या मालिकेतील ४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. तर एका सामन्यात पंकज रॉय संघाचे कर्णधार होते.
दत्ताजीराव गायकवाड हे सर्वात वयस्कर खेळाडू होते. १४ फेब्रुवारी रोजी त्यांने वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू..
दत्ताजीराव गायकवाड यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघाचं प्रतिनिधित्व केलं. ते १९४७ पासून ते १९६१ पर्यंत बडोदा संघासाठी क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी ४७.५६ च्या सरासरीने ३१३९ धावा केल्या. यात १४ शतकांचा समावेश आहे.
तसेच नाबाद २४९ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्यांनी १९५९-६० च्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. २०१६ मध्ये ते भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते. यापूर्वी दिपक शोधने हे भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते.