सोयगाव : सोयगाव तालुक्यात खरिपात २६ हजार २५५ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. परंतु, विमा कंपनीच्या बेजबाबदार धोरणामुळे शेतकरी अद्यापही पीकविम्यापासून वंचित आहेत. तालुक्यात खरिपाच्या कपाशीसह सात पिकांचे दुष्काळामुळे ८० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला होता. असे असतानाही पीकविमा कंपनीकडून पीकविमा मंजुरीसाठी उंबरठा उत्पन्नाचा निकष लावण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
तालुक्यात यंदाच्या खरिपात २६ हजार २५५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यापैकी पीकविमा कंपनीच्या सूचनेनुसार नुकसानीच्या ७२ तासांत २३ हजार ५२४ शेतकऱ्यांनी पोर्टलवर नुकसानीच्या तक्रारी नोंदविल्या आहे. परंतु, तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांनाही अद्यापही पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. पीकविमा कंपनीकडून अजूनही निकषावर निकष लादण्यात येत आहेत. त्यामुळे तक्रार केलेल्या शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, नुकसानीची तक्रार न केलेल्या दोन हजार ७३१ शेतकऱ्यांना कंपनीकडून उंबरठा उत्पन्नाची अट अनिवार्य केली आहे. एकीकडे कृषी आणि महसूलने शासनाला दिलेल्या खरिपाच्या ८० टक्के नुकसानीचा अहवाल पीकविमा कंपनीला मान्य नाही. त्यामुळे उंबरठा उत्पन्न ठरवूनच या ऑफलाइन असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. उत्पन्नच हाती नाही. मग उंबरठा उत्पन्नाची अट कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे.