गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. नुकतीच मनसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळामध्ये बैठकही झाल्याचे समोर आले होते. या युतीच्या चर्चेवरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
“वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही संविधान टिकवण्याच्या भूमिकेसाठी आमच्याबरोबर येण्याचे कबूल केले आहे. तसेच येत्या काळामध्ये जर राज ठाकरे आमच्यासोबत आले आणि सर्वच पक्षांना ते मान्य असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करू, ” असे महत्वाचे विधान रोहित पवार यांनी केले.
तसेच “राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका आम्हाला भावली. ते भाजपाविरोधात बोलतात म्हणून त्यांची भाषणे आम्हाला भावली, असे नाही. ते जनतेच्या मूळ प्रश्नावर बोलत असतात, असे म्हणत राज ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पहावे लागेल..” असेही रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.
“राज ठाकरेंचे जे ट्विट असतात, वक्तव्य असतात ते सर्व भाजपच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेसाहेब आपली भूमिका बदलतात का? महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवतात का? हे आपल्याला पहावे लागेल. ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि जनतेबरोबर राहिले तर आम्ही कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून नक्कीच स्वागत करू,” असेही आमदार रोहित पवार म्हणाले.