परभणी/ लातूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी; या मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार परभणी, लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू असून परभणी शहरातील जिंतूर- परभणी महामार्गावरील विसावा कॉर्नर व काळी कमान येथे मराठा तरुणांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. याबरोबरच परभणी बस विभागातील सातही आगारातील बस वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासून बंद करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनकांनी जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ह्यामध्ये महिलांचा सहभाग दिसून आला.
लातूर- बार्शी महामार्ग अडवला
लातूर : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा देण्यात येतो आहे. राज्यातील ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान लातूर- बार्शी महामार्ग लातूरच्या मुरुड येथे मराठा समाजातील आंदोलकांनी गेल्या एक तासापासून आडवून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांच्या समर्थनात हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.