पुणेः पुणे पोलिसांची इतिहासातील सर्वात मोठी कारवाई म्हणून या ड्रग्ज विरोधातल्या मोहिमेकडे बघितलं जात आहे. पुणे, दौंड, दिल्लीसह इतर ठिकाणच्या करवाईत तब्बल चार हजार कोटी रुपये किंमतीचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे.
केवळ तीन दिवसांमध्ये चार हजार कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर धागेदोरे शोधण्यासाठी आणि आणखी ड्रग्जच्या मागावर पुणे पोलिस देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेले आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या सोमवार पेठेत केवळ २ किलो ड्रग्ज सापडलं होतं. त्यानंतर १९ फेब्रुवारीला विश्रांतवाडीत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज सापडलं. यासह दौंडमध्ये ५५० किलो ड्रग्ज सापडलं आहे.
पुणे पोलिसांना वरचेवर ड्रग्जचे साठे आणि त्याबद्दलची माहिती मिळतच गेली. २० फेब्रुवारीला करकुंभ एमआयडीसीत ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं. याच दिवशी म्हणजे २० फेब्रुवारी रोजीच पुणे पोलिसांनी दिल्लीत ८०० किलो ड्रग्ज जप्त केलं. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पुणे पोलिसांनी दिल्लीतच १२०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.
तीन दिवसामध्ये तब्बल ४ हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे. पुणे पोलिसांच्या काही सात ते आठ टीम दिल्लीला रवाना झालेल्या आहेत. तसेच ड्रग्जचं मुंबई कनेक्शनही शोधलं जातंय. यात आंतरराष्ट्रीय धागेदोरे असल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे. पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडक मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावरील ड्रग्जचे साठे जप्त होत आहेत.