मरवडे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले असून हिवाळी अधिवेशनातच जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी मंगळवार दि.12 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील हजारो पेन्शन फायटर या पेन्शन लढ्यात सहभागी होणार आहेत. कोण म्हणतो देणार नाही?, अरे घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पेन्शन फायटर्सकडून दिला जात आहे.
महाराष्ट्र राज्यात 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. ही नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यासाठी अन्यायकारक असून 1982 च्या आदेशानुसार आम्हाला जुनी पेन्शन योजना मंजूर करावी यासाठी गेल्या सतरा वर्षापासून कर्मचारी लढा देत आहेत.
मार्च महिन्यात राज्यभर करण्यात आलेल्या संपामुळे शासनाने कुटुंब निवृत्ती वेतन योजना तसेच निवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्व लक्ष्मी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असल्याचे समोर आले असून हा अहवाल सुधारित एनपीएस सुचविणारा असल्यास जुनी पेन्शन लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
जुनी पेंशन व्यतिरिक्त इतर पर्याय राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना अमान्य आहेत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने येत्या 12 डिसेंबरला पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन केले असून राज्यातील 10 लाख कर्मचारी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुनी पेन्शन मागणीसाठी सहभागी होणार आहेत त्यामुळे नागपूरात 12 डिसेंबर ला जुन्या पेन्शनचे वादळ धडकणार आहे .
1982 च्या आदेशाप्रमाणे जशी आहे तशीच जुनी पेन्शन मिळावी यासाठी लढा देत असताना शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊन बोळवण केली आहे. यावेळी मात्र शासनाकडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आमचं ठरलंय; आम्ही निघालोय, आपलं काय असे म्हणत या पेन्शन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन पेन्शन फायटरकडून करण्यात येत असून लढेंगे और जितेंगे भी असा विश्वास शासकीय कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे.
बक्षी समितीच्या अहवालात एनपीएस सुधारणा शिफारसी सुचवल्या असल्याचे समजते. त्यामुळे 14 डिसेंबरला होणारा निर्णय एनपीएसचा सुधारित निर्णय असण्याची शक्यता आहे. जुन्या पेन्शनची आमची एकमेव मागणी आहे; ती मान्य झाल्याशिवाय लढा थांबणार नाही.
-ज्योती कलुबर्मे, जिल्हा नेत्या, जुनी पेन्शन हक्क संघटना सोलापूर
कर्मचारी लढा थांबण्यासाठी जुनी पेन्शन योजना बहाल करणे हाच एकमेव पर्याय राज्य शासनासमोर आहे. सुधारित एनपीएस चे गाजर कर्मचाऱ्यांना कायम अमान्य आहे. जुनी पेन्शन द्या अन्यथा कर्मचारी वोट फॉर ओपीएस राबवणार आहे; तसेच 12 डिसेंबरच्या नागपूर मोर्चात लाखो कर्मचारी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत.
-दत्तात्रय सलगर, सचिव, जुनी पेन्शन हक्क संघटना मंगळवेढा