पुणे– शहरात पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तसेच राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जात असताना निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यात निखील वागळे जखमी झाले नसले तरी गाडीचे मोठे नुकसान झाले होते. हल्ल्यात ते थोडक्यात बचावले होते.
निखील वागळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी निखील वागळे यांच्या पुण्यातील निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध केला होता. पोलिसांनी निखील वागळे यांना कार्यक्रमस्थळी न जाण्याचा सल्ला दिला होता. पण, वागळे कार्यक्रमाला जाण्यावर ठाम होते. दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी निखील वागळे, असीम सरोदे यांना चार तास बसवून ठेवलं होतं. कार्यक्रमाला न जाण्याची त्यांना विनंती केली होती. वागळे जेव्हा कार्यक्रमाला निघाले तेव्हा दबा देऊन बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात यांना दुखापत झाली नाही. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर महायुती आणि महाआघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.