उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तब्बल १२ जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या पानेवाडी प्रकल्पातून एक जार ह४०० टँकरची ठप्प झालेली वाहतूक मंगळवारी (ता. २) दुपारनंतर सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी वाहतूकदारांशी चर्चा करत त्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
केंद्र सरकारने वाहतूकदारांच्या नियमात १६० वर्षांनंतर बदल करत ‘हीट ॲण्ड रन’ हा सुधारित कायदा केला आहे. या कायद्यात दोषी व्यक्तीला दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद केली आहे. या विरोधात वाहतूकदारांनी सोमवार (ता. १)पासून बंद पुकारला होता.
त्या मुळे सोमवारी सायंकाळपासूनच पेट्रोलपंपांसमोर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांच्या रांगा लागल्या. इंधन संपल्याने मंगळवारी शहरातील पेट्रोलपंप दिवसभर बंद राहिले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा करत मनमाड येथे बैठक घेत तोडगा काढण्याचे आदेशित केले.
मात्र तरीही वाहतूकदार संपावर कायम असल्यास पोलिस बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी शर्मा यांनी सकाळी मनमाडला जात बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर अखेर संप मागे घेण्याबाबत वाहतूकदारांनी सहमती दर्शविली.
कायदा सर्वांसाठी समान
चालकांनी मांडलेल्या म्हणण्यावर एक कार्यशाळा घेण्यात येईल. त्यात कायद्याचा काय हेतू आहे, हे सांगितले जाणार आहे. चालकांचे गैरसमज दूर करण्यात येतील. वाहनचालकांच्या समस्या केंद्र सरकारकडे आम्ही मांडणार आहोत. वाहनचालकांना थोडी असुरक्षितता वाटते. पोलिस प्रशासन त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी या वेळी सांगितले.
येथे जाणवला परिणाम
मनमाडमधून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना इंधनपुरवठा केला जातो. या संपामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये इंधनटंचाई दिसून आली.
या घटकांवर झाला परिणाम
– नाशिक शहरातील सर्व कंपन्यांच्या ११० पेट्रोलपंपांपैकी ७० टक्के पंप बंद राहिले
– ग्रामीण भागातील ४५० पेट्रोलपंपांपैकी ४० टक्के बंद
– इंधनाअभावी स्कूल बसची चाके थांबली
– भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या मालवाहू गाड्या दुपारनंतर चालू
– मालवाहतूक करणाऱ्या गाड्या दिवसभर ठप्प
– दुचाकी, चारचाकी वाहनधारकांची पेट्रोलसाठी धावाधाव
– पेट्रोलपंपचालकांचा ऑनलाइन पैसे स्वीकारण्यास नकार