नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंगाचा थरकाप उडवणारी घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश ढोणे गंभीर जखमी झाला आहे.
प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील रहिवासी होते. शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परतत होते.
मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच जखमीवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.