शाकाहारी असो वा मांसाहारी, लसणाच्या फोडणीशिवाय जेवणाला चवच येत नाही. वर्षभरापासून बाजारात लसणाची आवक घटल्याने ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची फोडणी बसत आहे.
मागच्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे लसणाचे दर पडलेले होते. पुरवठा जास्त आणि मागणी स्थिर असल्यामुळे कमी भाव मिळत होता. त्यामुळे गेल्या वर्षी लसणाच्या लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.
त्यामुळे गेल्या वर्षांपासून बाजारात लसूणाची आवक घटल्यामुळे दर आकाशाला भिडले आहेत. सध्या घाऊक बाजारात लसणाच्या दहा गाड्या येत आहेत. लहान गाड्यांमधून ही वाहतूक होत असून आवक निम्म्यावर आली आहे. सर्वसाधारण लसणाचे दर घाऊक बाजारात ५० ते १२० रुपये किलोपर्यंत असतात.
हेच दर आता २०० ते ३७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आवक वाढली तरच हे दर कमी होणार असल्यामुळे नव्या हंगामातील लसणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नव्या हंगामातील लसूण दरवर्षी मार्चनंतरच बाजारात येतो, त्यामुळे मार्चनंतरच लसणाचे दर कमी होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.
सध्या ओल्या लसणाचीच आवक सुरू
सध्या लसणाचे दर वाढले असल्याने काही व्यापारी आपल्या शेतातील ओला लसूण बाजारात पाठवत आहेत. हा लसूण २०० ते २५० रुपये किलोने घाऊक बाजारात विकला जात आहे. मात्र, हा ओला असल्याने दोन-तीन दिवसांतच तो काळा पडत आहे. त्याला बुरशी लागत आहे.
घाऊक बाजारातील लासणाचा दर
देशी ओला लसूण – २०० ते २५० रुपये किलो
उटी सुका लसूण – ३०० ते ३७० रुपये किलो