मुंबई – राज्याच्या प्रगतीचा महामार्ग असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गालगत लवकरच ‘म्हाडा’ची परवडणारी घरे होणार आहेत. म्हाडाने महामार्गाच्या उभारणीसाठी तब्बल एक हजार कोटी रुपये ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत. त्या बदल्यात ‘समृद्धी’ महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार मार्चअखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे निर्देश ‘म्हाडा’ने आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना दिले आहेत.
सध्या मुंबईसह राज्यभरात ‘म्हाडा’ची प्रादेशिक मंडळ कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’ला जागेची चणचण भासत असल्याने परवडणारी घरे बांधताना आणि ती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर मर्यादा येत आहेत. तसेच नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर परिसरातही ‘म्हाडा’च्या घरांची मागणी होत आहे.
दरम्यान, म्हाडाने दिलेले एक हजार कोटी रुपये एमएसआरडीसीने भांडवलामध्ये (इक्विटी) जमा केले आहेत. त्यामुळे पैसे लवकर मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘म्हाडा’ने समृद्धी महामार्गालगत असलेली जमीन घेण्याबाबतचा पर्याय एमएसआरडीसीला दिला आहे. त्याला त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
येथे जागेचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग सहा जिल्ह्यांतून गेला असला तरी नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत महामार्गालगत जागेचा शोध सुरू आहे.
घरांबरोबरच शहराचीही उभारणी करणार
सर्वसामान्यांना परवडणारी घरे उभारणे आणि नियोजनबद्ध शहर वसवणे हा म्हाडाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार समृद्धी महामार्गालगत पुरेशी जमीन मिळाल्यास आम्ही तेथे आवश्यकतेनुसार परवडणारी घरे उभारू तसेच शहराची उभारणी करू, अशी माहिती ‘म्हाडा’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सामान्यांना माफक दरात घरे उपलब्ध होऊ शकतील.
म्हाडाने समृद्धी महामार्गासाठी दिलेले पैसे परत मिळवणे, याला आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मात्र, ते पैसे मिळणार नसतील तर त्याच्या बदल्यात समृद्धी महामार्गालगत परवडणाऱ्या घरांसाठी आणि शहराच्या उभारणीसाठी जमीन मिळवणे हा आमच्यासमोर दुसरा पर्याय आहे. त्या अनुषंगाने आम्ही जागेची पाहणी सुरू केली आहे.
– अनिल वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा