शुक्रवारी रात्री उशिरा सरकारच्या अध्यादेशाची प्रत मिळाल्यावर जरांगे पाटलांनी सकाळी ९ वाजता वाशीतील शिवाजी चौकात सभा घेऊन उपोषण सोडणार अशी घोषणा केली. सभा स्थळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे पाटलांनी आपलं उपोषण अखेर सोडले.
या अद्यादेशामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना व त्या आधारे त्यांच्या गणगोतातील सग्यासोयऱ्यांना जातप्रमाण पत्र मिळणार आहे. तसेच मराठवाड्यात खूप कमी कुणबी नोंदी मिळाल्यामुळे शिंदे समितीला मुदत वाढ देऊन एक वर्ष समितीला काम करू द्या अशी विनंती जरांगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी १८८४ साली झालेल्या जनगणनेचे पुरावे आपण स्वीकारावेत अशीही मागणी जरांगेंनी केली.
गावागावात मराठा आणि इतर जातींमध्ये सलोख्याचं वातावरण असून काही मोठे नेते जातींमध्ये भांडणे लावायचे काम करत आहेत अशी टीकाही नाव न घेता जरांगेंनी केली. या प्रसंगी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून हा विजय सर्व मराठ्यांचा व आंदोलनासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यासर्वांचा आहे असे मत जरांगे पाटलांनी व्यक्त केले आहे.
“मी सर्वांना शांततेचे आवाहन करीत आहे. हा गुलाल अध्यादेशाचा आहे. मराठ्यांच्या मुलांना आरक्षण देऊन त्यांच्या डोक्यावर हा गुलाल टाकूया.”
— मनोज जरांगे पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आंदोलकांचे आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाचे व आंदोलकांचे कौतुक केले असून एकजूट कायम ठेवून शांततेत आणि संयमाने हे आंदोलन कोणतेही लागबोट न लागता यशस्वी केल्याबद्दल आंदोलकांचे आभार मानले आहेत. आमचे सरकार हे देणारे आहे. घेणारे नाही
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.मला तुमच्या वेदना माहीत आहेत म्हणून मी शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली होती. दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे.
आजचा दिवस हा विजयाचा दिवस आहे
मराठा समाजाचा संघर्ष मोठा असून या समाजाने अनेकांना मोठे केले आहे. परंतु जेव्हा संधी देण्याची वेळ आली तेव्हा संधी द्यायला हवी होती. आजचा दिवस हा विजयाचा दिवस आहे. गुलाल उधळण्याचा दिवस आहे. म्हणून मी आपल्या प्रेमापोटी इथे आलो. मराठावाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हता त्या आता सापडू लागल्या आहेत. त्यामुळे आपले सरकार हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही.
मुख्यमंत्री असे ही म्हणाले की, “ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी जसे तुम्ही उभे राहिलात तसाच मी देखील सर्व सामान्य आहे. म्हणजन सर्व सामान्यांच्या मागण्या या सरकारने मान्य केल्या.”
ववंशावळ जुळवण्यासाठी हा अद्यादेश काढला आहे. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाच्या सवतील मिळतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळालाही साथ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही व त्यांच्या वारसदारांना नोकऱ्या आणि प्रत्येकी दहा लाख रुपये दिले आहेत.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री