मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ आज (शनिवार) परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले. यामुळे बहुतांश भागातील वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाज सेलू तालुकाच्या वतीने हादगाव पावडे, मोरेगाव, देवगाव फाटा, गोगलगाव पाटी, रेल्वे गेट सेलू , वालूर, कुंडी पाटी, राजवाडी पाणी फिल्टर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर बैल व बैलगाडी सोडून चक्काजाम करण्यात आले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदाेलनात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
याबराेबरच चारठाणा फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे दोन तास वाहतुकीवर परिणाम झाला. चारठाणा जिंतूर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.
गावकऱ्यांचा पाठिंब्यासाठी अन्नत्याग
पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील किशोर कदम, विठ्ठल कदम व संजय कदम गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे- पाटील यांची देखील तब्येत खालावत आहे.
आरक्षणासाठी सरकार पावले उचलत नसल्याने ग्रामीण भागामध्ये मराठा तरुणांकडून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले जात आहे. मराठा समाजाचा अंत पाहू नये तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान आज पाचव्या दिवशी मराठा समाजाच्या शेकडो महिलांसह पुरुषांनी एक दिवस अन्नत्याग करून या बेमुदत उपोषणामध्ये सहभाग नोंदवला. आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन ओबीसीतून आरक्षण अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.