राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आद्याप शांत झालेला नाही. सरकारने मराठा आरक्षणबाबत जी अधिसूचना काढली आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणासा सुरूवात केलीये. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते मनोज जरांगेंची भेट घेतील अशी चर्चा आहे. यावर जरांगे पाटलांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
अमित शहाना गरज वाटली तर ते स्वत: अंतरवाली सराटी येथे येतील. आमच्यातील कोणीही त्यांना भेटायला जाणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने मराठा आरक्षाबाबत केलेल्या घोषणेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यावरून ४-५ लोकांच्या हट्टासाठी सरकारनं मराठ्यांच्या पोरांच्या जीवाशी खेळू नये, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.
सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी, वेगळ्या आरक्षणाची चर्चा करू नये. ओबीसीतून आरक्षण दिलं तरच उपोषण मागे घेऊ अन्यथा मी उपोषण मागे घेईन हे सरकारने विसरावे, अशा शब्दांत जरांगेंनी ठापपणे सांगितलं आहे.
१५ तारखेच्या अधिवेशनात सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि हैद्राबाद गॅझेट स्वीकारलं नाही तर महाराष्ट्रात काय होतं हे यांना कळेल, असा गंभीर इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटलांचं उपोषण कशासाठी?
सरकारने मराठा आरक्षणबाबत अधिसूचना जारी केली आहे. मात्र त्यावर अद्याप अंमलबजावणीला सुरूवात झालेली नाही. अधिसूचनेवर लवकरात लवकर अंमलबजावणीला सुरूवात व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत.