अंतरवाली सराटीः सरकारने सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. येत्या २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्यापासून मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी निवेदन द्यावं. २४ तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तो रोको करायचा. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
”कालचं आरक्षण आपल्या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे. परंतु ते आरक्षण आम्हाला नकोय. देशतली ही पहिली घटना आहे गरीबांनी श्रीमंतांना आरक्षण दिलं. ज्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होते, त्यांना मिळालं आहे. तेही आरक्षण रद्द झालं तर मराठ्यांच्या तरुणांचं सात वर्षांचं नुकसान होईल.” अशी भीती जरांगेंनी बोलून दाखवली.
मनोज जरांगे यांच्या मागण्या
- कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावं
- सगेसोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा
- नसता हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी-मराठा एकच असल्यचा निर्णय घ्या
- एका ओळीचा आदेश काढून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा
- अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या
- माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ द्या