राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाने धक्का दिला असून दिग्गज नेते अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदारांचा मोठा गट बाहेर पडणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता…
कॉँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या असून आमदारांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नसीम खान यांची एकत्रित बैठक सुरु आहे.
या बैठकीत इतर आमदारांना संपर्क साधला जात आहे. फोन कॉन्फरन्सद्वारे ही बैठक सुरू असून काँग्रेसच्या 35 ते 38 आमदारांना संपर्क करण्याचे काम सुरू आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेनुसार आमदारांची लिस्टही मागवली आहे. ह्यात काही आमदारांशी संपर्क झाला असून, इतर आमदारांशी संपर्क सुरू आहे.
सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया..
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बड्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी “महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिति पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.