सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता महायुतीकडून उदयनराजे हे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे साताऱ्यातील मुख्य लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात थेट ‘सामना’ होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (BJP) उमेदवारांची बारावी यादी आज, मंगळवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रामधून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. पक्षाने उदयनराजे भोसले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
उदयनराजे भोसले यांनी काल भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच अर्ज घेऊन ठेवला होता. तसेच त्यांनी अनामत रक्कम देखील भरली होती. उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यावर ठाम होते. तसेच त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती. त्यानंतर आज मंगळवारी भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपकडून उमेदवारांची १२ वी यादी जाहीर
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १२ वी यादी जाहीर केली. या यादीत सात उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील सातारा, पंजाबमधील ३ जागा, उत्तर प्रदेशच्या दोन जागा, पश्चिम बंगालमधील एक जागेचा समावेश आहे.
शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात
शरद पवार गटाने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शशिकांत शिंदे यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. शशिकांत शिंदे यांनी काल शरद पवारांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. यावेळी शशिकांत शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. तत्पूर्वी, आता सातारा लोकसभेत शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे.