नवी दिली– भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळत असल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी त्यांना याविषयी बोलून त्यांचे अभिनंदन केले आहे. ( bjp leader lal krishna advani got bharat ratna award)
अडवाणी हे एकेकाळचे सर्वात प्रतिष्ठित नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. अडवाणी हे तळागाळात काम करुन वरती आलेले आणि उपपंतप्रधान पदापर्यंत गेलेले नेते आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. संसदेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण आणि ऐकण्यासारखी असायची, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
"I am very happy to share that LK Advani will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour..," PM Narendra Modi tweets. https://t.co/6gyT2TJaI7 pic.twitter.com/YmKIHz52G8
— ANI (@ANI) February 3, 2024
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख चेहरे होते. राम मंदिर निर्माणाचं श्रेय त्यांना दिलं जातं. त्यामुळे मोदी सरकारने त्यांना त्यांच्या कार्यासाठी गिफ्ट दिल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केला होता.
लालकृष्ण अडवाणी यांनी तीनवेळा भाजपची कमान सांभाळली आहे. भाजपच्या वाढीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. जवळपास ५० वर्ष ते राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर ते भाजपचे दुसरे सर्वात मोठे नेते होते. १९९६ मध्ये सरकार बनल्यानंतर तेच पंतप्रधान होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला सहमती दर्शवली. त्यांचे आयुष्य त्याग आणि समर्पण यांनी भरलेले आहे.