जपान वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला. शक्तिशाली भूकंपानंतर सुमारे १५५ वेळा जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. बहुतेक भूकंप हे रिश्टर स्केलवर 3 पेक्षा जास्त तीव्रतेचे होते. आज म्हणजे मंगळवारी किमान सहा जोरदार हादरे जाणवले आहेत.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. बचावकार्य सुरु असून पीडितांना मदत केली जात आहे.
१३ जणांना मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे १५५ भूकंप झाले. त्यापैकी दोन भूकंपांची तीव्रता ७.६ आणि ६ रिश्टर स्केल इतकी होती. ७.६ आणि ६ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे जपानच्या पश्चिम किनारपट्टी भागात मोठी हानी झाली. अनेक घरांची पडझड याठिकाणी झाली. भूकंपामुळे आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
32 हजारांहून अधिक घरांची वीज गायब
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, होन्शुच्या मुख्य बेटावरील इशिकावा प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.६ इतकी होती. भूकंपामुळे इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या. 32 हजारांहून अधिक घरांची वीज गेली आहे.
भूकंपानंतर हवामान विभागाने याठिकाणी त्सुनामीचा इशाला दिला आहे. त्सुनामीमुळे समुद्रात ३ ते ५ मीटर लाटा उसळू शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले जात आहे.