जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडिगोद्री येथे एक भीषण अपघात झाला आहे. अंकुशनगर साखर कारखान्यजवळ भरधाव कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा असताना एक कार भरधाव वेगात आली आणि कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णता चक्काचूर झालाय.
सदर कार छत्रपती संभाजी नगर मार्गे बीडकडे निघाली होती. मात्र अंकुश नगर सहकारी साखर कारखान्यासमोर वाटेतच काळाने घाला घातला. कारचा चक्काचूर झाल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय.
अपघातात सदर कार कंटेनरखाली दबली गेली असून कार जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सध्या सूरू आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली असून अपघातग्रस्त वाहन कंटेनर खालून काढण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात अपघाताच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नागरिक वाहनांची वेगमर्यादा पाळत नसल्याचे कारण अनेक अपघातांत समोर आले आहे. डोंबिवलीमध्ये देखील आज अपघाताची एक मोठी घटना घडली. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा अन्य वाहनांना धडकल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.