हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या दालनात शाळा भरवली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर सीईओनी लागलीच शिळेवर शिक्षकाची नेमणूक केली.
जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे. शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे. तर काही शाळांवर विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याचे देखील चित्र पाहण्यास मिळते. असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नाही. यामुळे विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले होते. यामुळे आज शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत येत सीईओंच्या दालनातच आंदोलन सुरु केले.
विद्यार्थ्यांनी सीईओंच्या दालनात आंदोलन करत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद कार्यालयात बे एक बेचा पाढा म्हणण्यास सुरवात केली. चिमुकल्याच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला आहे.