हिंगाेली जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमात प्रसादासाठी तयार करण्यात आलेल्या भगरीतून शेकडाे ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना समाेर आली आहे. हिंगाेली येथील शासकीय रुग्णालयात (hingoli general hospital) सुमारे दीडशे ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून प्राप्त झाली.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील रेणापूर गावात धार्मिक सप्ताहाच्या कार्यक्रमात शिजविण्यात आलेल्या भगरी मधून दीडशे ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. यामध्ये महिला पुरुष व चिमुकल्यांचा समावेश आहे.
दरम्यान मध्यरात्री व सकाळी सर्व ग्रामस्थांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर हिंगोलीच्या आरोग्य विभागाचे एक पथक देखील रेणापुर गावांमध्ये दाखल झाले.
ज्या ग्रामस्थांना त्रास जाणवत आहे. त्या ग्रामस्थांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विषबाधा झालेल्या बहुतांश ग्रामस्थांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हिंगाेली शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.