जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असणाऱ्या गुगलच्या नविन फीचर्सची वापरकर्त्यांना नेहमीच प्रतीक्षा असते. नुकत्याच पार पडलेल्या ‘गुगल क्लाऊड नेक्स्ट 2024’ या इव्हेंटमध्ये गुगलने अनेक फीचर्स आणि अॅप्स लाँच केले. यामध्ये एआय-पॉवर्ड ‘गुगल विड्स’ नावाच्या अॅपचाही समावेश आहे. व्हिडीओ एडिटिंगसाठी या अॅपचा वापर केला जाणार आहे. तसंच या इव्हेंटमध्ये गुगलने ट्रान्सलेट फॉर मी, एआय सिक्योरिटी एड-ऑन आणि नवीन जीमेल फीचर्स देखील लाँच केली आहेत. गुगलच्या या नव्या अॅप्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात..
गुगल विड्स
व्हिडिओ बनवण्यासाठी गुगलने गुगल विड्स (Google Vids) हे नविन अॅप लाँच केलं आहे. याच्या माध्यमातून यूजर्स नवीन व्हिडीओ तयार करु शकणार आहेत. एवढंच नाही, तर व्हिडिओ शेअर करण्यासाठी देखील याचा वापर करता येतो. व्हिडिओ बनवत असताना यूजर्स त्यामध्ये आपला व्हॉइसओव्हर, म्हणजे संवाद अपलोड करू शकतील. तसंच या अॅपमध्ये काही प्रीलोडेड व्हॉइसओव्हर देखील उपलब्ध आहेत. या अॅपचा वापर व्हिडिओ रायटींग, प्रोडक्शन आणि एआय एडिटींगसाठी करु शकतात.
ट्रान्सलेट फॉर मी
‘गुगल मीट’साठी कंपनीने ट्रान्सलेट फॉर मी (Translate for me) हे नविन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर Google Meet च्या माध्यमातून होणाऱ्या मिटींग दरम्यान वापरले जाणार आहे. याच्या माध्यमातून गुगल मिटींग दरम्यान होणाऱ्या गप्पा यूजर्स त्यांना हव्या असलेल्या भाषेत लिखित स्वरुपात वाचू शकणार आहेत. सध्या हे फीचर तब्बल 69 भाषांना सपोर्ट करतं असं कंपनीने स्पष्ट केलं.
एआय सिक्योरिटी एड-ऑन
गुगलने डॉक्युमेंट्सच्या सुरक्षेसाठी एआय सिक्योरिटी एड-ऑन हे फीचर लाँच केले आहे. या माध्यमातून यूजर्स आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतील. हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सना दरमहा १० डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत.
जीमेल फीचर
गुगलने जीमेलसाठी देखील एक नवीन फीचर लाँच केलं आहे. व्हॉइस प्रॉम्पटिंग फीचर (Voice Prompting Feature) असं याचं नाव आहे. या फीचरमुळे इमेल पाठवण्यासाठी आपल्याला फक्त बोलून कमांड द्यावी लागेल, त्यानंतर हे फीचर इमेल तयार करुन तो सेंडही करेल. तसंच, आपण इमेल तयार करण्यासाठी काही शब्द किंवा वाक्यं लिहिली तरी हे फीचर संपूर्ण मेल तयार करेल आणि सेंड करेल. आपल्याला आलेल्या मेलला उत्तर देण्यापासून नवीन इमेल लिहिण्यापर्यंत सर्व कामे हे नविन फीचर करु शकते.