Friday, December 6, 2024
Homeताज्या-बातम्याभारत निवडणूक आयोगाच्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक – विभागीय आयुक्त...

भारत निवडणूक आयोगाच्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

रिपोर्टर :- चरणसिंह बंजारा

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीबाबत प्रशिक्षण

औरंगाबाद, दि.24, (विमाका) :- निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त झालेल्या प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामकाज पार पाडताना दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेविषयी दिलेल्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज केले.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2023 बाबत सहायक निवडणूक अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते. औरंगाबाद विभागात 227 मतदान केंद्रे असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी – कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सहाय्यक आयुक्त पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, विभागातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मिनियार उपस्थित होते.

श्री.केंद्रेकर म्हणाले, निवडणूक कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामकाज होईल याबाबत दक्षता घ्यावी. निवडणूक प्रक्रियेत कामकाज करताना कोणत्याही प्रकारे चूका होणार नाहीत याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

सहाय्यक आयुक्त पांडुरंग कुलकर्णी यांनी मतदान प्रकियेतील विविध टप्प्याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. मतदान प्रक्रिया, मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मतपेट्या उघडणे, बंद करणे, सिलबंद करणे, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी तसेच मतदानावेळी तसेच मतमोजणी प्रक्रियेवेळी कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही त्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतदार यादी, मतदारांचा अनुक्रमांक याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मिनियार, उपजिल्हाधिकारी भारत कदम, अंजली धानोरकर यांनीही निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली.

यावेळी निवडणूक विषयक नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments