नाशिकः गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी येवल्यात छगन भुजबळांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय. आमच्या गावात, आमच्या शेतात येऊ नका; अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
येवल्यातील सोमठाणदेश गावात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी भुजबळांचा ताफा जाताच गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे भुजबळांनी त्यांच्या दौऱ्यात बदल केला.
”तुम्ही हुतात्मा स्मारक साफ केलं होतं आणि आमच्या गावचे रस्ते साफ करतो” असं म्हणत मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडून निषेध नोंदवला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांना विरोध होताना दिसतोय.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या पाहाणी दौऱ्याला अनेक गावांमध्ये विरोध झाला. बुधवारपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. त्याच्यामध्ये मराठा आंदोलक भुजबळांना पाहाणीसाठी येऊ नका, गावचा निर्णय झालेला आहे; असं सांगत आहेत.
भुजबळांनी भूमिका स्पष्ट करत दौऱ्याला जाणार असल्याचं सांगितलं. जिथे मला बोलावतील तिथं जाणार आणि जिथं बोलावणार नाहीत तिथं जाणार नाही. गावबंदी कराल तर एक महिन्याची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा छगन भुजबळांनी यावेळी दिला.