मुंबई : छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात एक पत्र आलं आहे. त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देणारं हे पत्र आहे. या पत्रात म्हटलं आहे की, “साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. या लोकांनी तुम्हाला उडवण्याची ५० लाखांची सुपारी घेतली आहे.
या गुंडांपासून सावध राहा, हे ५ जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत. सागर हॉटेलसमोर यांची मिटिंग झाली आहे. साहेब सावध राहा” असा मजकूर या पत्रात हातानं लिहिलेला आहे.
छगन भुजबळ सध्या राज्यात चर्चेचा विषय आहेत. कारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश झाल्यास ओबीसींमधील इतर जातींचा आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यातूनच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. यापूर्वी देखील भुजबळ यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती.