Sunday, December 8, 2024
Homeताज्या-बातम्याChagan Bhujbal: ओबीसी समाजाची परीक्षा घेऊ नये, लोकशाही मार्गाने जे आहे ते...

Chagan Bhujbal: ओबीसी समाजाची परीक्षा घेऊ नये, लोकशाही मार्गाने जे आहे ते करू; अन्यथा…

मराठा आरक्षणाला आमचा अजिबात विरोध नाही; मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण जाहीर करावे, आमचे आम्हाला द्या, आमच्या ताटात वाटेकरी होऊ नका, दबलेल्या-पिचलेल्या लोकांना वर आणण्याची आमची भूमिका आहे.

तुम्ही आमची परीक्षा बघू नका, आम्ही पण लढू शकतो यासाठी ओबीसींची जातगणना करा; मग आमची ताकद कळेल’, असा इशारावजा आव्हानच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले आहे.

शहापूर तालुक्यातील वालशेत (जि. ठाणे) येथे ओबीसी आरक्षणासाठी भरत निचिते यांनी २६ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले होते. मंत्री भुजबळ यांनी गुरुवारी निचिते यांची उपोषणस्थळी भेट घेत आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच भुजबळ यांच्या उपस्थितीतच हे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. भुजबळ पुढे म्हणाले की, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तसेच कोणाचीही लायकी काढून आपण मोठे होत नसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेही ओबीसी, दलित व आदिवासी समाजाचे होते, असा दाखला देत भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्याचा खरपूस समाचार भुजबळांनी घेतला. कोणीही ओबीसी समाजाची परीक्षा घेऊ नये. लोकशाही मार्गाने जे आहे ते करू, अन्यथा निवडणुकीत प्रत्येकाला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

बीड पेटवले, हॉटेल पेटवली, दोन आमदारांची घरे पेटवली, असा उद्विग्न सवाल करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला ही शिकवण दिली काय, असा संतप्त सवालही त्यांनी केला. दरम्यान, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या मतावर ठाम भूमिका घेऊन न्या. शिंदे यांनी इकडे-तिकडे फिरणे बंद करावे व ज्या कुणबी निजामकालीन नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमची हरकत नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे, भिवंडी ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादीच्या विद्या वेखंडे, काँग्रेसचे प्रकाश भांगरथ, शिवसेना ठाकरे गटाचे काशिनाथ तिवरे, भिवंडी प्रांत अमित सानप, अनिल निचिते आदींसह हजारो ओबीसी समर्थक उपस्थित होते.

पुन्हा उपोषणाचा इशारा

येत्या अधिवेशनात ओबीसी जातगणना करण्याचा ठराव घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यावर भरत निचिते यांनी उपोषण सोडले. ओबीसी जातगणनेचा ठराव संमत न झाल्यास अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा उपोषणास बसण्याचा इशाराही निचिते यांनी या वेळी दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments