हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक ड्रायव्हर्स रस्त्यावर उतरले आहेत. कालपासून वाहन चालकांसह युनीयने मुंबईसह अन्य ठिकाणी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केलीये. या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून ३ तारखेपर्यंत पेट्रोल पंप देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट युनियनने सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. ख्रिसमस सुट्ट्यानंतर काही शाळा आज तर काही शाळा उद्या सुरू होत आहेत.
त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलेय. यासंबंधी स्कूलबस मालकांनी शाळांना त्यासोबतच संबंधित विद्यार्थ्यांना कळविले आहे.
आंदोलनामुळे राज्यातील स्थिती
अमरावतीच्या भाजीपाला बाजार पेठेवरही मोठा परिणाम
केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्याने संपूर्ण देशात याचे पडसाद उमटत आहेत.अशात ट्रक चालकांच्या संपाचा अमरावतीच्या भाजीपाला बाजार पेठेवरही मोठा परिणाम होतोय. दररोज होणाऱ्या भाजीपाला मालाच्या तुलनेत आज भाजीपाल्याची आवक 30 टक्यांनी घटलीये. बाहेर जिल्ह्यातील भाजीपाला बाजारपेठेत आला नसल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दररोज अमरावती बाजारपेठेत 35 ते 40 ट्रकमधून भाजीपाला आणला जातो. आज मात्र आठ ते दहा ट्रक आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलीये. टमाटर कॅरेटच्या दरामध्ये आज 150 रुपयांनी वाढ झाली आहे.
अहमदनगर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद
संपामुळे अहमदनगर शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्याचे पेट्रोल पंपासमोर बोर्ड लागलेत. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने पुकारलेल्या संपाचा हा परिणाम आहे. रात्री उशिरा शहरातील सर्वच पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची होती गर्दी झाली होती.
नाशिक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
नाशिक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. जवळपास दोन ते तीन तास रांगेत उभे राहुन पेट्रोल आणि डिझेल भरावा लागत आहे. त्यामुळे अनेक लोकांना कामावर जाण्यासाठी उशिर होत आहे. तर काही लोक एक ते दोन तास आधीच कामावर जाण्यासाठी घरातून निघाले आहेत.
केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा पास केला त्याच्या विरोधात मालवाहतुकदार चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नाशिक शहरात पेट्रोल आणि डिझेलचा, तुटवडा जाणवत आहे. आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे फलक पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहेत.