समृद्धी महामार्गावरुन एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. या घटनेत अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने चालक व वाहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील मेहकरजवळ नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या वेळी चालकाला झोप लागल्याने भरधाव ट्रक बॅरिकेड्सला धडकून जाग्यावर पलटी झाला. या मोठ्या अपघातानंतर ट्रकने जाग्यावरच पेट घेतला.
ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातचं आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये ट्रक चालक व वाहकाचा होरपळून मृत्यू झाला. आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला असून चालक तसेच वाहकाच्या मृतदेहही पुर्णपणे जळालेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.