बीड जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर याच दुष्काळाच्या झळा आता जिल्ह्यातील गाव खेड्यात दिसू लागल्या आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने अडवलेले जलजीवनचे काम पूर्ण होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याच मागणीसाठी बीडच्या दिंद्रुड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून बीड- परळी महामार्ग अडवत रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील विविध भागात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यंदा राज्यातील अनेक भागात पाऊस कमी पडल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. बीड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.
याच पार्श्वभूमीवर अडवलेले जलजीवनचे काम पूर्ण होईपर्यंत गावात पाण्याचे टँकर सुरू करा, अशी मागणी करत बीडच्या दिंद्रुड येथील ग्रामस्थांनी बीड- परळी महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. विशेष म्हणजे गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जलजीवनच्या कामाला सुरुवात करण्यात आली.. मात्र हे काम अद्याप पूर्ण न झाल्याने दिंद्रुड ग्रामस्थांवर दुष्काळाची वेळ आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जल जीवनच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे. असे असताना काही जणांनी या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपावरून काम बंद पडल्याने दिंद्रुडकरांवर पाण्याच्या भीषण टंचाईची वेळ आली आहे. जलजीवनचे काम लवकरात लवकर करावे व तोपर्यंत गावात टँकर सुरू करण्यात यावे. अशी मागणी दिंद्रुड ग्रामस्थांनी केली आहे.