अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेससह वंचित आघाडीने उमेदवार उभे केलेले आहेत. त्यातच आता महायुतीमध्ये असलेल्या बच्चू कडूंनी स्वतःच्या पक्षाचा वेगळा उमेदवार निश्चित केला असून उमेदवाराचं नावदेखील फायनल झाल्याचं पुढे आलेलं आहे.
बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या वतीने उमेदवार उभा केला जाणार असल्याचं खुद्द कडूंनी जाहीर केलं होतं. त्या उमेदवाराचं नाव आज पुढे येत आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब हे प्रहार संघटनेच्या वतीने अमरावती लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. याबाबत पत्रकार परिषदेद्वारी अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.’टीव्ही ९’ने हे वृत्त दिले आहे.
भाजपने नवीनत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्याने बच्चू कडू नाराज आहेत. राणांनी आमच्याबद्दल खालच्या भाषेत विधानं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं काम करणार नाही, एकवेळ राजकारणातून बाहेर पडू पण राणांचं काम करणार नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं होतं.
स्वतः बच्चू कडूंनी वर्ध्यातून उभं राहावं, अशी प्रहारच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवारामुळे पेच निर्माण होणार आहे. नवीनत राणा यांचं काम प्रहार संघटना अजिबात करणार नाही, शिवाय भाजप आणि शिवसेनेचे लोक आपल्यासोबत असल्याचंही बच्चू कडूंनी सांगितलं होतं.
एकीकडे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे, दुसरीकडे मात्र बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये एकामागोमाग बंडखोऱ्या उफाळून येत असल्याचं दिसून येतंय.
अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर झाली असून वंचितकडून प्राजक्ता तारकेश्वर यांना लोकसभा लढवण्याची संधी मिळालेली आहे. त्यातच आता महायुतीमध्ये असलेल्या प्रहार संघटनेकडून दिनेश बूब यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय.