मराठा आरक्षणाच्या दृष्टीकोनातून मराठा समाजासाठी आज महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर आज (6 डिसेंबर रोजी) पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 6 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाच्या पाच पाचसदस्यीय घटनापीठाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण अवैध ठरवलं होतं. त्याचबरोबर मराठा समाज मागासलेला असून त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशी शिफारस करणारा न्या. गायकवाड समितीचा अहवाल कोर्टाने फेटाळून लावला होता.
मराठा समाजाला आरक्षण देताना इंद्रा साहनीप्रकरणी घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे आरक्षण देता येणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. संसदेने १०२ वी घटनादुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असाही निष्कर्ष कोर्टाने नोंदविला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.