Friday, November 22, 2024
Homeताज्या-बातम्याMaharashtra Loksabha: लोकसभेच्या ४८ पैकी किमान ३० जागा भाजप लढवणार?

Maharashtra Loksabha: लोकसभेच्या ४८ पैकी किमान ३० जागा भाजप लढवणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तीन राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या ४८ पैकी किमान ३० जागा लढवणे योग्य ठरेल, असा अहवाल सर्वेक्षण संस्थांनी दिल्याचे समजते.

आदिवासी भागातील पालघर आणि ठाणे, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई उत्तर-पश्चिम, कोल्हापूर आणि औरंगाबाद हे आधी युतीत भाजपकडे नसलेले मतदारसंघ भाजपने लढणे श्रेयस्कर ठरेल, असे या सर्वेक्षणात आढळले आहे.

यातील शिंदे गटाकडील मुंबईतील दोन्ही मतदारसंघ भाजपने लढवायचे ठरवले तर शिवसेनेचे शक्तिस्थळ असलेल्या मुंबईत ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच मैदानात नसेल; मात्र धनुष्यबाण चिन्हच मैदानात नसल्याचा फटका तर बसणार नाही ना, याचा विचार भाजप आणि शिंदेसेना एकत्र बसून करणार आहेत. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यांना न दुखावता ठाण्याचा प्रश्न सोडवला जाईल, असे यासंदर्भात एका ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीसमोर धनुष्यबाण जनमत खेचू शकेल; मात्र महाराष्ट्रातील काही ठिकाणी पंजा विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई झाली तर एनडीए आघाडीच्या यशावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. महानगरात भाजपला मोठा प्रतिसाद असून अशा सर्व मतदारसंघांत कमळ हेच चिन्ह प्रभावी ठरेल, असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावेत, असे यापूर्वीच भाजपने सुचवले होते. आता नव्या स्थितीत हा आग्रह पुढे रेटला जाऊ शकतो.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकल्यानंतर देशात भाजपच्या किमान २५० लढती विजयी टप्प्यात पोहोचतील, असे भाकीत केले गेले. छत्तीसगडमधला विजय अनपेक्षित मानला, तरी तो मोदींच्या प्रभावाची खूण आहे.

महाराष्ट्रातील बारामती, चंद्रपूर, सांगली या भाजप लढवत असलेल्या जागा या विजयानंतरही जिंकणे सोपे नाही. महानगरे आणि आदिवासी भागात कमळलाट असल्यास राजेंद्र गावित (पालघर) आणि राहुल शेवाळे (मध्य मुंबई) या जागा कमळावर लढवल्या जाऊ शकतात.

शेवाळे हे कार्यक्षम नेते आहेत. ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. ठाकरे गटाच्या मशालीसमोर ते धनुष्यबाणावर जिंकतील; पण ही जागा काँग्रेसकडे गेल्यास निवडणूक कठीण बनेल, असे हा अहवाल सांगतो. नागपूर तसेच पुणे ही महानगरे, नांदेड व अकोला ही शहरे तसेच नंदुरबार हा आदिवासी मतदारसंघ भाजपतर्फेच लढवला जातो.

मात्र संभाजीनगर (औरंगाबाद), कोल्हापूर आणि गजानन कीर्तिकर यांचा मतदारसंघ येथे बदल करावा, अशी या अहवालात शिफारस आहे. सातारा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने निवडणूक लढावी की भाजपतर्फे उदयनराजे भोसले यांनी, यावरही विचार होऊ शकतो. रामटेक, वाशीम, उत्तर-मध्य मुंबई येथे नवे चेहरे देणे आवश्यक आहे का, हे तपासण्याचा सल्लाही या अहवालात आहे.

भाजपमध्ये नवे प्रवेश?

भाजपच्या ताज्या यशामुळे कुंपणावरचे काही नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. यात काही बड्या काँग्रेस नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. मुंबईत ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात जायचे की भाजपमध्ये, याचा हिशेब मांडत आहेत; मात्र ज्या शिवसेनेवर गेल्या निवडणुकीत टीका केली; त्यांना पक्षात घेणे कितपत उचित ठरेल, असा प्रश्न भाजप समोर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments