सांगली : राज्यात अदृष्य शक्ती मराठा आणि ओबीसी समाज भिडवण्याचे काम करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीमध्ये केला.
आज सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा झाली. सभेपूर्वी अॅड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, वंचित आघाडी सत्तेत आली तर हमीभाव कायद्याची अंमलबजावणी करेल. तालुका स्तरावरच्या पंचायत समितीला हमी भावाप्रमाणे माल विकला जातो की नाही हे बंधनकारक करून उणिवा आढळल्या तर फौजदारी कारवाईचे अधिकार असतील. कृषी धोरणामध्ये हमी भाव कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आमचे धोरण राहील.
केंद्र शासनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण विचारपूर्वक दिसत नाही. देशातील मुस्लिम समाजाशी ज्या पध्दतीने वागते, त्याच पध्दतीने अन्य राष्ट्राशी वागत असून हाच मापदंड ख्रिश्चन समाजाबाबत असेल तर अमेरिका युरोपबाबत लावला जाणार का? परदेशात राहणार्यांनी केंद्र सरकारला आमचे नातेवाईक का धोक्यात घालता असा सवाल विचारला पाहिजे असेही ते म्हणाले.
माध्यमांशी बोलतांना अॅड. आंबेडकर यांनी सांगितले, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळबाबत आपण तीन दिवसांनी सविस्तर भूमिका मांडू. मराठा आरक्षण हा निझामी मराठा आणि रयतेचा मराठा असा लढा असून गेली ७० वर्षे सत्तेत असणार्या निझामी मराठ्यांनी रयतेतील मराठ्यावर अन्याय केला असून मनोज जरांगे-पाटील हे रयतेतला मराठ्यांचे नेतृत्व करीत आहेत. अदृष्य ताकद राज्यात ओबीसी आणि मराठा समाज भिडविण्याचे काम करीत आहे. धनगर समाज आरक्षण मुद्दा पुन्हा आला आहे. ३ डिसेंबर रोजी चार राज्यांचा निकाल हाती येतील, त्यानंतर ६ डिसेंबर नंतर अयोध्या येथून नवी मोहिम हाती घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.