Friday, November 22, 2024
Homeदक्षिण भारत राज्य“शेतकरी उद्ध्वस्त अन् आधुनिक निरो…”, ‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका

“शेतकरी उद्ध्वस्त अन् आधुनिक निरो…”, ‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका

तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘सामना’ अग्रलेखातून केली आहे.

“कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती,” अशी खंतही ठाकरे गटानं व्यक्त केली आहे.

“अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार?”

“महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून ‘मायबाप’ सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी ‘सरकार’ असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे, पण महाराष्ट्रात चित्र उलटेच दिसत आहे. पावसाळग्रातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. शेतशिवारांमध्ये सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यातील मिंधे सरकार इतर राज्यांतील निवडणूक प्रचारात मशगुल आहे. अशा सत्ताधाऱ्यांना मायबाप कसे म्हणणार?” असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

“…अन् त्यावर त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाहीत”

“ऐन पावसाळ्यात अवर्षणामुळे दुष्काळी परिस्थिती आणि पावसाळा संपल्यावर मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीचे तडाखे असे दुहेरी संकट कोसळत आहे. या सततच्या आपत्तींचा महाराष्ट्राच्या ग्रामीण जनजीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो आहे. जीव लावून, कष्ट करून, घाम गाळून पिकवलेली पिके व कर्जे काढून फुलवलेली शेतशिवारे व फळबागा डोळयांदेखत नेस्तनाबूत होत असताना शेतकऱ्यांना ज्या यातना व जे दुख होत असेल, त्याची कल्पनाही करवत नाही. सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी खचला आहे. कधी सुदैवाने निसगनि साथ दिली आणि बंपर उत्पन्न झाले तर नेमके तेव्हाच या शेतमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकयांचे उत्पन्न दुप्पट करू, अशा बाता सरकार मारते; पण शेतकरी खरोखरच उत्पादन वाढवतो तेव्हा त्याच्या हाती काहीच उरत नाही ही वस्तुस्थिती आहे व त्यावर सरकारी पोपट काही बोलत नाहीत,” अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.

“…तर अजित पवार हे कोमात आहेत”

“राज्यातील तमाम शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे? महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत. पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?” असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंवर टीकास्र डागलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments