Thursday, November 21, 2024
Homeदक्षिण भारत राज्यविकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय शुभारंभ बळसोंड येथे केंद्रीय सचिव कौस्तुभ गिरी...

विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय शुभारंभ बळसोंड येथे केंद्रीय सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते फित कापून केला

हिंगोली (जिमाका), दि. 24 : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहिम आजपासून दि. 26 जानेवारी, 2024 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथे केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आत्माराम बोंद्रे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, बळसोंडचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते.विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केंद्रीय सचिव कौस्तुभ गिरी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते दि. 26 जानेवारी, 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा मुळ उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यावेळी बोलताना म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे. माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जनजागृती करणे. नागरिकांशी संवाद-वैयक्तिक कथा/अनुभव सांगुन सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे. आणि यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे हे या विकसीत भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने या यात्रेच्या यशस्वीतेसाठी योग्य नियोजन केले आहे. जिल्ह्यात 5 एलईडी चित्ररथाद्वारे दररोज 2 गावात विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसिद्धी आणि शासकीय योजना व त्यांच्या उपलब्धतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्रुटी दूर करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री पोषण अभियान, आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे आणि पीआर कार्ड काढण्याचे मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी केले आहे.

यावेळी उमेदच्या लाभार्थी यांनी ज्योती गांजरे यांनी बचतगटाच्या माध्यमातून मला फायदा झाला आहे. त्यांना मिळालेल्या 15 हजाराच्या फिरत्या निधीतून शिलाई मिशन घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्याकडे 40 गटाचा समुह केला असून या समुहाच्या माध्यमातून माझ्यासह गटातील कुटुंबाचा आर्थिक विकास झाला आहे. तसेच मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळाल्यामुळे ते आज स्वाभिमानाने जगत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सर्व शिक्षा अभियान, कृषि विभाग, महिला बचत गट यासह विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी सचिव कौस्तुभ गिरी व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन माहिती घेतली व आपणाकडे असलेल्या सर्व योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स यांच्या टीम कडून गावागावात मोठ्या ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असून या ड्रोनला वीस लिटर एवढ्या क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून या द्वारे अत्यंत कमी वेळात आणि कमी रसायनात फवारणी होते. याची सर्व माहिती सचिव कौस्तुभ गिरी व जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी घेतली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments