हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 9 सप्टेंबर, 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी 1718 प्रकरणापैकी 293 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच वाद दाखलपूर्व विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, वाद दाखल पूर्व 4494 प्रकरणा पैकी 79 प्रकरणे असे एकूण 372 प्रकरणे तडजोडी आधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणात तब्बल 6 कोटी 68 लाख 67 हजार 550 रुपये रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.
या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती एस. एन. गाडेकर-माने, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी. के. नंदनवार, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यू. राजपूत, श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए.एम. जाधव, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या लोकअदालतीमध्ये अर्जदारातर्फे ॲड. एस. बी. गडदे यांनी दाखल केलेल्या मोटार अपघात प्रकरणात तडजोड रक्कम एक कोटी पाच लाख रुपयाचा धनादेश जिल्हा न्यायाधीश-1 आर. व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती एस. एन. गाडेकर-माने यांच्या हस्ते अर्जदाराला देण्यात आला.
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर हिंगोली येथे 192 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.