गेल्या डिसेंबरमध्ये राज्य शासनाने राज्यात १७ हजार पोलिस शिपाई पदांसाठीच्या भरतीची घोषणा केली. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले असता नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाकडे १५ हजार, तर नाशिक ग्रामीणकडे नऊ हजार अशा एकूण २४ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आचारसंहितेमुळे भरतीची पुढची प्रक्रिया थांबविण्यात आली असली, तरी जूनअखेर भरतीची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने राज्यभरात १७ हजार ४७१ जागांसाठी पोलीस शिपाई भरतीची घोषणा केली. त्याप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभही करण्यात आली. ३० मार्चपर्यंत उमेदवार अर्ज करण्याची मुदत होती. त्यास १५ एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलिस आयुक्तालयात रिक्त ११८ पदे, तर जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण दलातील रिक्त ३२ जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे.
भरतीसाठी शहर आयुक्तालयाकडे सुमारे १५ हजार, तर नाशिक ग्रामीणकडे सुमारे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, तर राज्यातील १७ हजार ४७१ रिक्त जागांसाठी राज्यभरातून १७ लाख अर्ज आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जूनमध्ये पुढील प्रक्रिया
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत थांबविण्यात आली आहे. जूनमध्ये निवडणूक संपेल. त्यानंतर पोलिस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.