जात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा सुधारित नमुना उपलब्ध अर्जदारांनी उपविभागीय कार्यालयाकडे संपर्क साधावा.
हिंगोली : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील पात्र विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा देणा-या अर्जदार, उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज सादर केल्यानंतर विनाविलंब प्रमाणपत्र देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. यापूर्वीच दि. 15 मार्च, 2024 च्या शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी स्तरावर सुरु होती. मात्र आज मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश दिले आहेत.
राज्य विधानमंडळाने राज्यपालांच्या मान्यतेने दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम-2024 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी विनाविलंब प्रमाणपत्र देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे.
पोलीस भरतीसाठी दि. 15 एप्रिल, 2024 पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. त्यासाठी तातडीने जिल्ह्यातील मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनाविलंब जात प्रमाणपत्र देऊन त्यांचे नुकसान टाळावे. यासाठी दत्तात्रय पवार, लोखंडे राजेश व ज्ञानेश्वर निरगुडे यांच्यासह 15 विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना आज निवेदन सादर केले आहे.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र दि. 15 मार्च, 2024 शासन निर्णयानुसार जात व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचा सुधारित नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार अर्जदारांनी विहित नमुन्यात सादर केलेल्या अर्जावर तातडीने निर्णय घेऊन जात प्रमाणपत्र निर्गमित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.