विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या. आज पुन्हा विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. जेऊर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश तापमानाची नोंद झाली.
आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला गेलाय. राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
बुधवारी बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीने तडाखा दिला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम शहरासह संपुर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. तरीही हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सूटका झाली.
जिल्ह्यात काल दिवसभर प्रामुख्याने आकाश निरभ्र होते.तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानही पाहायला मिळाले. दुपारी बहुतांश ठिकाणी खेळती हवा पाहायला मिळाली. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर कमाल तापामान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दरम्यान पुढील आठवडाभर तरी संपूर्ण जिल्ह्यात आकाश निरभ्र राहून संध्याकाळी ढगाळ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.