वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील अनेक गावांना वादळ, गारपीट, अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. संत्र्याची झाडं उन्मळून पडल्यामुळे बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संत्र्याची मोठ्याप्रमाणात गळतीही झाली आहे. जमिनीवर संत्र्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गुरुवारी अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसेच यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
पुढील दोन दिवस हवामानाची अशीच स्थिती राहील, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या काही भागात शुक्रवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळसह गावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसाने काढणीला आलेली खरीप हंगामातील पीके उद्ध्वस्त झाली.
याशिवाय रब्बी पिकांचं देखील नुकसान झालं आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातही शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. जवळपास एक तास जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस कोसळला.
त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच अनेक तालुक्यातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. अवकाळीमुळे रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार असून गहू, हरबरा, तूर , कांदापिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शेगांव तालुक्यातील टाकळी विरो येथील एका युवकाचा अंगावर विज पडल्याने मृत्यू झाला आहे. सूरज निंबाळकर असे मृत्य झालेल्या युवकाचा नाव असून सायंकाळी पेट्रोल पंपावर कामासाठी घरून निघाला होता, रस्त्यातच त्याच्या अंगावर विज कोसळली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.