कोल्हापूर : बार्टी प्रशासनाने ज्या प्रकारे १० जानेवारी रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्याचे घोषणापत्र जाहीर केले, त्याचप्रमाणे सारथी प्रशासनानेसुद्धा १० जानेवारी रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून द्यावी, अशा मागणीचे निवेदन पत्र सारथी कार्यालय, पुणे येथे दिले. तसेच, सोमवारी महाराष्ट्रातून सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालय पुणे येथे ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. जोपर्यंत सारथी प्रशासनाकडून १० जानेवारी रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द करून २०२३ च्या बॅचला सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्याचे घोषणापत्र मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थी मागे हटणार नाहीत, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
२०२३ च्या बॅचला सरसकट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी, यासाठी कोल्हापूर, पुणेसह राज्यभर साखळी उपोषणे सुरू आहेत. तरीही सरकारने अट्टाहासाने २४ डिसेंबर रोजी सीईटी घेतली पण त्यातही २०१९ चा सेटचा पेपर जशाच्या तसा आल्यामुळे ती परीक्षा रद्द केली गेली. त्यानंतर १० जानेवारी रोजी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला. या अन्यायकारक निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलने केली. मात्र सारथी संस्थेकडे कोणतेही अधिकार नाही व मंत्रिमंडळच यावर निर्णय घेऊ शकते असे फसवे उत्तर सारथी संस्थेकडून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आले.
याबाबत बोलताना विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, “बार्टी संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन १० जानेवारीला घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द करून BANRF २०२२ अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप देऊ करते. जर बार्टी संस्था निर्णय घेऊ शकते तर सारथी संस्थेनेसुद्धा २०२३ साली अर्ज केलेल्या सर्व १३२९ पात्र विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा रद्द करून नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप द्यावी. तसे लेखी परिपत्रक प्रशासन जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मागणी मान्य न झाल्यास सर्व संशोधक विद्यार्थी सारथी विभागीय कार्यालय, पुणे येथे आमरण उपोषण करतील”, अशी माहिती संशोधक विद्यार्थ्यांनी दिली.