देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात पसरायला सुरुवात झाली आहे. राज्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ११ नव्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात JN.1 च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असं आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान देशात JN.1 व्हेरिएंटचे ४ रुग्ण आढळून आले होते.
या राज्यांमध्ये संसर्ग पोहोचला
INSACOG व्यतिरिक्त, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने देखील आरोग्य मंत्रालयाला एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की JN.1चे संक्रमण देशातील 11 राज्यांमध्ये पोहोचले आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त, गोवा, पुद्दुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, ज्यांच्या नमुन्यांचा जीनोम अनुक्रम अहवालाची प्रतीक्षा आहे.
देशभरात कोरोना रुग्णातही मोठी वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी कोरोनाचे ३५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे संसर्गामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमध्ये ३, कर्नाटकात २ आणि पंजाबमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
JN.1 व्हेरिएंटची लक्षणे कसे ओळखाल?
JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्याने नागरिकांनी वेळीच सतर्क होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. जेएन १ व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी, तो किती घातक आहे याबाबत अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही.