हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. हे इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र कार्यरत राहणार आहे. हे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र निवडणूक घोषित होईपर्यंत सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज फित कापून करण्यात आले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या प्रात्यक्षिक केंद्रामध्ये आवश्यक सुविधा कोणकोणत्या असतात याची पण माहिती देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय एलईडी रथ फिरणार असून या एलईडी रथाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. ही जनजागृती मोहिम सुरु असून ती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या 14 नोव्हेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार निवडणूक घोषित करण्याच्या तीन महिने आगोदर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्र व मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन्सच्या प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृतीसाठी हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या एकूण मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन जिल्ह्यातील नगारिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन माहितीही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचेजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्घाटन
RELATED ARTICLES