‘टर्निंग 18’ मोहिमेच्या माध्यमातून तरुण तसेच प्रथमच मतदान करणाऱ्यांना लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी केले प्रेरित
आकर्षक संकल्पना, ईसीआयच्या लोकप्रिय चिन्हांचा तसेच नव्या पिढीतील सामग्रीच्या सहयोगासह अनुरुप संदेश धोरण
निवडणूक प्रक्रीयेसंदर्भातील खोट्या बातम्या तसेच चुकीची माहिती यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम.
देशभरात यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु असताना, भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) विविध समाज माध्यम मंचांवर ‘टर्निंग 18’ आणि ‘यू आर द वन’ यांसारख्या अनोख्या अभियानांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नाविन्यपूर्ण वाट चोखाळली आहे. यासाठी आयोगाने ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ या संकल्पनेच्या अंतर्गत अनुरूप संदेश धोरणाचा वापर सुरु केला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यू ट्यूब यांच्यासह सर्व मुख्य समाज माध्यम मंचावर निवडणूक आयोग सध्या सक्रीय असून सार्वजनिक ॲप, व्हॉट्सअप वाहिनी आणि लिंक्ड इन या मंचाचा देखील वापर आयोगाने अलीकडेच सुरु केला आहे.
‘टर्निंग 18’ अभियान
मतदानाचा टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात विविध प्रसंगी निवडणूक आयोगाला, मतदानाप्रती शहरी भागात आणि युवा वर्गात दिसून येणारी उदासीनता हा चिंतेचा विषय होता. 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान आयोगाने सुरु केलेले ‘टर्निंग 18’ अभियान युवावर्ग तसेच प्रथमच मतदान करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करते. आगामी निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी युवावर्गाला प्रोत्साहन देणे तसेच याआधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेली शहरी तसेच तरुण वर्गातील उदासीनतेची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे मुख्य उद्देश आहेत.
‘टर्निंग 18’ हे अभियान त्याच्या इच्छित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध आकर्षक संकल्पना आणि धोरणांचा वापर करते.
राज्य निवडणूक अधिकारी (सीईओज) तसेच डीडीन्यूज आणि आकाशवाणी यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक प्रसारण संस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या विस्तृत जनजागृतीमुळे ‘टर्निंग 18’ अभियानाचा लक्षणीय प्रभाव दिसून येत आहे. तसेच, या अभियानाचा परिणाम अनेक पटीने वाढवण्यासाठी ईसीआयने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील एसव्हीईईपी चिन्हांच्या लोकप्रिय नेटवर्कशी सहयोगी संबंध प्रस्थापित केले आहेत. या एकत्रित प्रयत्नांमुळे या अभियानाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत झिरपण्यास आणि त्यायोगे अधिक परिणामकारकरीत्या इच्छित वर्गापर्यंत पोहोचून आगामी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती निर्माण होण्यास मदत होईल.
‘यू आर द वन’ मोहीम
भारतीय निवडणूक आयोगाने ‘टर्निंग 18’ या मोहिमेद्वारे, ‘यू आर द वन’ या आणखी एका प्रभावशाली उपक्रमाला आरंभ केला आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या विविध घटकांच्या अमूल्य योगदान जाणून ते साजरा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.मतदान प्रक्रियेत मतदार आणि राजकीय पक्षांपासून ते मतदार केंद्रावरील अधिकारी (बूथ लेव्हल ऑफिसर,बीएलओ), सर्व स्तरातील कर्मचारी, निवडणुकीला उभे असलेले विविध पक्ष, प्रशासकीय कर्मचारी, माध्यम व्यावसायिक, विविध केंद्रीय दल आणि सुरक्षा कर्मचारी, तसेच प्रत्येक भागधारक निवडणूक प्रक्रियेची एकात्मिकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. आकर्षक कथन आणि मनमोहक दृकश्राव्य प्रणालींद्वारे (जसे की ‘ जे काही लागेल – आपल्या सुविधेसाठी पावलोपावली आम्ही तुमच्या सोबत आहोत, ‘)या मोहीमेत या व्यक्तींची समर्पण वृत्ती आणि वचनबद्धता अधोरेखित केली जात आहे तसेच, लोकशाही चौकटीत त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांविषयी जनतेत अभिमान निर्माण करत आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख घटक, मनोरंजक किस्से आणि भूतकाळातील निवडणुकांतील गोष्टी यांच्या व्हिडिओ/रील्सचा समावेश आहे ज्यामुळे पडद्यामागे काम करणाऱ्या मतदान सुरळीतपणे होण्यासाठी विविध हितसंबंधीतांचे अथक प्रयत्न उलगडून दाखवले जात आहेत, तसेच प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचण्याची खात्री करण्यासाठी आव्हानात्मक विभागात ते जनजागृती करत आहेत.
निवडणूकीतील वैशिष्ट्यपूर्ण आणि मनोरंजक किस्से, शब्दकोडे, निवडणूक शब्दकोशासह मतदारांना आकर्षित केले जात आहे.
या मोहिमेची इतरही विविध मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत जसे की यात निवडणूकीतील किस्से’ ज्यातून मागील निवडणुकीतील रंजक कथा सामायिक केल्या जात आहेत. त्यानंतर भारतीय निवडणूक पद्धतीतील A-Z मालिकेतून वापरकर्त्यांना निवडणुकीशी संबंधित नियम आणि प्रक्रियांची माहिती देण्यात येत आहे. निवडणूक आयोग संबंधित शब्दकोडे (ECI सह वर्ड प्ले) ही आणखी एक मनोरंजक खेळ आहे ज्यात वापरकर्ते निवडणूक प्रक्रियेशी संबंधित शब्द शोधण्यात गुंग होतात. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व संबंधित प्रश्नांची उत्तरे देणारी ‘सवाल जवाब’ मालिकाही यात आहे. अशा तऱ्हेने भारतीय निवडणुकांचा सुरुवातीपासून दृश्य प्रवास पोल्स आणि पिक्सल मालिकेद्वारे,सामायिक केला जात आहे.
‘व्हेरीफाय बिफोर यू ॲम्प्लीफाय’ उपक्रम
ऑनलाईन खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती यांचा प्रसार रोखण्यासाठी, ईसीआयने ‘व्हेरीफाय बिफोर यू ॲम्प्लीफाय’ उपक्रम (पोस्ट से पहले पुष्टि) उपक्रम सुरु केला आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत दिली. खोट्या बातम्या प्रसारित न करण्यासाठी तसेच कोणतीही माहिती समाज माध्यम मंचांवर सामायिक करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याची विनंती त्यांनी सर्वांना केली. कोणतीही सामग्री सामायिक करण्यापूर्वी त्याची अचूकता आणि अधिकृतता तपासून घेण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे आणि त्यायोगे, चुकीच्या माहितीचा प्रसार रोखून निवडणूक प्रक्रियेची अखंडता कायम राखण्याच्या उद्देशाने ही सक्रीय उपाययोजना हाती घेण्यात आली आहे.
तसेच वापरकर्त्यांना अचूक आणि क्रमवार माहिती मिळण्यासाठी निवडणूक वेळापत्रकाची माहिती, माहिती, तंत्रज्ञानविषयक उपाय आणि आयोगाच्या निर्णयांसह इतर महत्त्वाचे पैलू, मतदान यादीतील नावे तपासणे, मतदान केंद्रांची माहिती या सर्व बाबी देखील ग्राफिकच्या माध्यमातून तसेच रीलच्या स्वरुपात सामायिक करण्यात येत आहेत.
सर्जनशील धोरणे आणि समाज माध्यमांच्या सामर्थ्याचा वापर करून देशभरातील नागरिकांना निवडणूकविषयक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना या लोकशाही प्रक्रियेतसक्रियतेने भाग घेण्यासाठी सक्षम करणे आणि भारतीय लोकशाहीच्या या चैतन्यपूर्ण उत्सवात योगदान देणे हे निवडणूक आयोगाच्या उपक्रमांमागील उद्दिष्ट आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत असताना सुरु केलेले हे प्रयत्न म्हणजे, समावेशक आणि सहभागात्मक स्वरुपाची निवडणूक घेण्याप्रती ईसीआयच्या बांधिलकीचा दाखला आहे.