मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या सुरु आहे. आज (मंगळवार, ५ डिसेंबर) दौऱ्याच्या पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांच्या अकोला तसेच वाशिम जिल्ह्यात सभा झाल्या. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास सरकारला जड जाईल.. असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
काय म्हणाले जरांगे पाटील?
“आतापर्यंत मराठा ओबीसीत असलेल्या 35 लाख नोंदी सापडल्या. मग या अगोदर मराठा ओबीसीत नाही हे कोणी सांगितलं? त्यांचं नाव आता मराठ्यांना कळायला हवं. जर हेच आरक्षण मराठ्यांना 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज मराठा जगाच्या पाठीवर एक नंबर म्हणून राहिला असता,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर (Chhagan Bhujal) निशाणा साधला. “पूर्वीपासूनच मराठा समाज आणि ओबीसी समाज एकत्र आहोत, मात्र त्यांना वाटतं की ओबीसी आरक्षणात आपण सुरक्षित नाहीये, असं ओबीसी आरक्षणतील 29 जातींच असं म्हणणं आहे..” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“सरकारने आरक्षणाच्या निर्णयासाठी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतलाय. महाराष्ट्राच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला कायदा पारित होईल. मात्र 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण जर नाही दिलं तर सरकारला जड जाईल…” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
“मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं हे लिहून घेतलेलं आहे. त्यात जर बदल झाला तर तुमचं अवघड आहे. आम्हाला त्याच पद्धतीने आरक्षण हवं आहे आणि आम्ही तेच घेऊन राहणार…” असेही जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी बांधवांनी दाखवले काळे झेंडे…
दरम्यान, अकोल्यातील सभा आटोपून वाशिमकडे (Washim) जाताना मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील तामसे फाट्यावर हा प्रकार घडला. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असताना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.